गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासह इतर सण, तसेच मंगलकार्यात प्लास्टिक तसेच थर्माकोलच्या वस्तू वापरावर गडहिंग्लजमध्ये बंदी घालण्यात आलीय. याबाबतची नोटीस मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी प्रसिध्द केली आहे. याद्वारे व्यावसायिक, तरुण मंडळे आणि नागरिकांना याचा वापर न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव काळात थर्माकोलपासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तू, तसेच मंगलकार्यात महाप्रसादाच्या वेळी सिंगल युज प्लास्टिक ताट, प्लास्टिक थर असणाऱ्या पत्रावळ्या, प्लेट, चमचे, ग्लास अशा सर्व वस्तूंच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्लास्टिक बंदी पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत अशा विक्रेते, व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीत अशा वस्तूंची विक्री किंवा वापर होत असताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची सूचना मुख्याधिकारी खारगे यांनी जनतेला केली आहे.