इचलकरंजी (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेपासून काही अंतरावर पाणीपुरवठा सभापती जवाहर उर्फ बाबासो पाटील यांच्यावर आज (मंगळवार) सकाळी खुनी हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील हे सकाळी गणेश बँकेनजीक आले होते. त्यावेळी त्यांची एका अज्ञात व्यक्तीसोबत वादावादी सुरु झाली. त्याच दरम्यान जवाहर पाटील यांच्यावर त्या व्यक्तीने धारधार शस्त्रांनी  हल्ला केला. त्याला प्रतिकार करीत असताना पाटील हे किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अचानक हल्ल्याची घटना घडल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. तर गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले.

यावेळी जवाहर पाटील यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील यांच्यावर भरवस्तीत जीवघेणा हल्ला झाल्याने शहर हादरले आहे. शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. दरम्यान, सायंकाळ पर्यंत अद्याप याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. तर हल्ला होऊनही पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहेत.