कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला देखील त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित राहून ना. पाटील यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाला यंदा 111 वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून कृष्णराज महाडिक आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्या पुढाकाराने ‘केएम चषक’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. ना. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पर्धेदरम्यान जिद्द, चिकाटी, मेहनत यांचे प्रदर्शन करून उपविजेता ठरलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच या स्पर्धेत विजेत्या शिवाजी तरुण मंडळाला दोन लाख रुपये आणि चषक, उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला एक लाख रुपये तसेच चषक, वैयक्तिक खेळाडूंनाही बक्षिसे देण्यात आली. तसेच महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साडी बक्षीस देण्यात आली.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.