मुंबई : दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केजरीवाल यांना हाय डायबिटीजचा (उच्च मधुमेह) त्रास आहे. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन आणि औषधं दिली जात नाहीयेत. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने थोडी मानवता बाळगली पाहिजे.अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या विधानसभेत केजरीवाल यांच्याकडे बहुमत आहे. तसेच ते एक सामाजिक कार्यकर्तेदेखील आहेत. तुम्ही (भाजपा सरकार) त्यांना त्यांची औषधं देत नाहीत. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवू देत नाही. याचा अर्थ तुम्ही तुरुंगात त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करताय का?असा सवाल राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांनादेखील येत आहे. तुरुंगात असताना मलाही खूप वाईट अनुभव आले आहेत. माझी औषधं माझ्यापर्यंत पोहोचवली जात नव्हती. औषधांसाठी मला झगडावं लागत होतं. आमच्या लोकांना आमची औषधं आम्हाला देण्यापासून रोखलं जात होतं. जर आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर तुरुंगातील सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल? दिल्लीचे माजी मंत्री मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय बदला घेण्यासाठी तुम्ही या लोकांना तुरुंगात टाकलं आहे आता किमान त्यांना त्यांची औषधं तरी द्या.

पुढे बोलताना राऊत म्हणाले,जेव्हा आणीबाणीच्या काळात लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी तुरुंगात होते तेंव्हा इंदिरा गांधी तुरुंगातील अधिकाऱ्यांशी बोलायच्या.त्यांच्या जेवणाची औषधांची विचारपूस करायच्या.त्यांची राहण्याची व्यवस्था निट आहे की नाही हे पहायच्या.परंतु मोदी – शहा सरकार मुख्यमंत्र्यांना साधं औषधही मिळू देत नाहीत.अशा प्रकारचं हे सैतानी सरकार आहे.