मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात अश्लील भाषा वापरली आहे. हे पत्र कोठून आले आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याप्रकऱणी  नवाब मलिक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहीत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही, तर कार्यकर्त्यांसह मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नवाब मलिक यांना एका निनावी फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजस्थानमधून हा फोन आल्याचा मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणू नका, अशी धमकी मलिक यांना देण्यात आली होती.