कोल्हापूर (प्रतिनिधी) : हेरे येथील रमाकांत गावडे यांच्यावर झालेल्या अन्यायप्रकरणी जबाबदार लोकांवर ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा चंदगड़ तालुका जनशक्ती युवा संघटना उपाध्यक्ष अनंत गावडे (रा. कोलीक) यांच्यासह आणखी २५ जणांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रमाकांत गावडे यांचे १६ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू आहे. याबद्दल आजतागायत प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, ही गंभीर बाब आहे. चंदगड तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही हे दुर्भाग्याची बाब आहे. मग सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास मंत्रालयासमोर २०-२५ कार्यकर्त्यांसह आत्मदहन करणार आहे. या प्रकरणी कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास चंदगडचे गटविकास अधिकारी कार्यालय आणि संबंधित यंत्रणा जबाबदार असेल.

यापूर्वी चार जणांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे इशारा दिला होता. त्या निवेदनावर आत्मदहनाबाबतची कोणतीही तारीख नसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येते.