कुरुंदवाड (प्रतिनिधी) : हेरवाड-घोसरवाड या मार्गावर गेल्या आठवड्याभरापासून जुन्या घराचे दगड, विटा आणि माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने अपघात झाला आहे. नेर्ले मळा, जमादार मळा या भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा रस्ता एक जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच, घोसरवाड, दत्तवाड, दानवाड, एकसंबा, मलिकवाड, सदलगा या परिसरातील नागरिक आणि वाहनधारक नियमितपणे या मार्गाचा सर्रास वापर करतात.

हा रस्ता आधीच अरुंद असल्यामुळे अनेकदा दोन वाहने समोरासमोरून पास करताना वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यात आता बेकायदेशीरपणे टाकलेल्या या दगड, विटा आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर अडचण झाली आहे. परिणामी, वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आणि त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रात्री प्रवास करताना वाहनधारकां धोक्याचे झाले आहे.

रस्त्यावरील हा ढिगारा तातडीने न हटविल्यास आणखी मोठे अपघात होऊन एखाद्याचा बळी जाण्याची भीती परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या कडेला टाकलेला माती दगड-विटांचा ढिगारा त्वरित हटवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.