वाठार ( प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगावमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून वीस वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून झालेल्या तरुणीचे नाव पूजा खंडू अडगळे असे आहे. दरम्यान, अवघ्या बारा तासात खुनाचा छडा लावून वडगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासात संशयित आरोपी सनी अरुण कांबळे याच्या वाठार येथील राहत्या घरातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.


सविस्तर वृत्त असे की, एकतर्फी प्रेम प्रकरणातून बळी पडलेली तरुणी मूळची नांदेड मधील होती. बरेच वर्षांपासून वाठार येथे वीटभट्टी कामासाठी पीडित तरुणीचे कुटूंब आले होते. दरम्यान, पीडित तरुणी वाठार येथील एका चप्पल विक्री दुकानात कामाला होती. संशयित आरोपी सनी कांबळे हा चप्पल दुकानात वारंवार येत होता.

यातून पीडित तरुणी आणि संशयित आरोपी सनी कांबळे याची ओळख झाली होती. पीडित तरुणी काम आटोपून घरी निघाली होती. संशयित आरोपी सनी कांबळे याने दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्जनस्थळी आलेल्या वगळी जवळ तरुणीला गाठले. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून रस्त्याच्या कडेला नेले.यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.


दरम्यान आरोपी सनी कांबळे याने या तरुणीला फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून गळा दाबत खून केला. दरम्यान, घटनास्थळ निर्जन असल्याने सहसा कोणी जात नसल्याने खूनाचा प्रकार निदर्शनास आला नाही.

मात्र दोन दिवसाने एक शेतकरी जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी त्या भागात गेला होता. यावेळी कुजलेला वास आल्याने त्यानी शोध घेतला. यावेळी अर्धनग्न अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या धक्कादायक खुनाचा प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी वाठार परिसरात पसरली.

दरम्यान, वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी फोउज फाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा तपासासाठी विविध भागात पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. तपासाची सखोल चौकशीमध्ये खून केल्याचा संशयित म्हणून सनी कांबळे याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबूली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणीचा मृतदेहाचे शवविच्छेदन कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले.

अवघ्या चार तासात तपासाची चक्रे गतिमान करून पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, हवालदार रवींद्र गायकवाड, मिलिंद टेळी,महेश गायकवाड,आदींनी संशयीत आरोपी सनी कांबळे याला जेरबंद केला.या खून प्रकरणाचा तपास विभागीय पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.