दुबई : आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध रविवारी (दि. २८) सामना होत आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पाकिस्तानचा प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. आता दुसऱ्या प्रमुख गोलंदाजाच्या दुखापतींची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. मोहम्मद वसिमला पाठदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे पाकिस्तानचा संघाची चिंता वाढली आहे.

गुरुवारी सराव सत्राच्यावेळी मोहम्मद वसिमची पाठदुखी बळावली. लगेच त्याला एमआयआर स्कॅनसाठी दुबईच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा एमआरआयचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीद शाह आफ्रिदी गुडघे दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळत नाहीय. आशिया कप स्पर्धेत श्रीलंका, अफगाणिस्तानचे संघही आहेत. आशियातील या मातब्बर संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. २७ ऑगस्टला सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबरला होणार आहे.

आयसीसी अकादमीत सराव सुरु असताना गुरुवारी मोहम्मद वसिमला पाठदुखीचा त्रास झाला. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा पाठदुखीमुळे आशिया कप स्पर्धेत समावेश करण्यात आलेला नाही. आशिया कपनंतर पाकिस्तानचा संघ मायदेशात इंग्लंड विरुद्ध सात टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याधी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्येही तिरंगी मालिका खेळणार आहे. आशिया कपमध्ये १२ दिवसांत पाकिस्तानचा संघ पाच सामने खेळू शकतो. जुलै महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध मोहम्मद वसिमने पदार्पण केले होते. तो आतापर्यंत ११ टी-२० सामन्यात खेळला आहे. १५.८८ च्या सरासरीने त्याने १७ गडी बाद केले आहेत.