नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) देशात एका बाजूला महागाई वाढत असताना दुसऱ्या बाजूला आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळख असणाऱ्या भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी नफ्यात केवळ तीन महिन्यात सुमारे 101 टक्के वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

या कंपनीने यंदाच्या चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचा नफा जाहीर केला आहे. या तीन महिन्यांच्या अवधीत या कंपनीचा नफा 101 टक्क्यांनी वाढून 668 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या तिमाहीत हाच आकडा 608 कोटी इतका नोंदवण्यात आला होता. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 414 कोटींची नोंद झाली होती. त्यात 46.82 टक्के इतकी वाढ पाहायला मिळाली.


म्हणजेच, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेने दुप्पट नफा यंदाच्या वर्षी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीतून वेगळी अशी ही कंपनी बनण्यापूर्वी हाच आकडा 371 असा नोंदवण्यात आला होता, त्यात वाढ होऊन यंदा 668 कोटी इतका झाला आहे. पण, या कंपनीला व्याजातून होणाऱ्या नफ्यात मात्र तूट मिळाली आहे. हा नफा 7.86 टक्क्यांनी कमी होऊन 186 कोटी इतका कमी झाला आहे.


जुलै-सप्टेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचा एकूण मार्केट कॅप 1.43 लाख कोटी होती, जी आता वाढून 1.45 लाख कोटी इतकी झाली आहे. यंदाच रिलायन्स इंड्रस्टीजमधून ही कंपनी वेगळी करण्यात आली होती आणि ऑगस्ट 2023मध्ये शेअर मार्केटमध्ये हिची नोंदणी झाली होती.