मुंबई : राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २६ एप्रिल रोजी होणार आहे. मतदानाचे दिवस जसजसे जवळ येतील तशा नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडायला लागल्या आहेत. यामध्ये बहुचर्चित अशा हिंगोली मतदारसंघाचा देखील समावेश आहे. हिंगोलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोर लावण्यात येत असून आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही हिंगोली मतदारसंघाच्या प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ला केला.

मोदी आणि शहा यांना डोळ्यासमोर अपयश दिसत असल्याने ते महाराष्ट्रात सभांवर सभा घेत असल्याचा टोला दानवेंनी लगावला आहे.
हिंगोली येथे शनिवारी (ता. 20 एप्रिल) प्रचार सभा पार पडली. या सभेतून अंबादास दानवे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एवढ्या सभा घ्याव्या लागत आहेत, म्हणजे याचाच अर्थ इथे महाविकास आघाडी मजबूत आहे. त्यांचे अपयश त्यांना डोळ्यासमोर दिसत आहे. राज्याचे नेतृत्व कुचकामी दिसत आहे. दोन पक्ष फोडून गद्दार सोबत घेऊन, यश मिळत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार सुद्धा अतिशय पोचट झालेला आहे. तेच बहनो-भाईयो म्हणत खोटारड्या घोषणा करतात, त्याचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, असे टीकास्त्र दानवेंनी डागले आहे.

तसेच, सनातन धर्माचा अपमान शिवसेना करते, असे वक्तव्य पंतप्रधान यांनी केले होते. यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, सनातन धर्म या हिंदुस्तानमधील किती लोक मानतात, सनातन धर्माचा अर्थ अगोदर या देशाला समजून सांगावा, या सनातन धर्माचा अपमान कोण-कोण करत, हेही समजून सांगावे. सनातन धर्माचा मान कोण-कोण ठेवते, त्याच रूढी-परंपरा सोडून वैज्ञानिक युगात जायचे का नाही, ते आपण ठरवले पाहिजे, असा टोला दानवेंनी लगावला.
तर, पंतप्रधानांनी जानकर यांना लहान भाऊ म्हटले आहे. पण त्यांनी बहिण मानलेल्या भावना गवळीचे जसे हाल झाले तसेच काहीसे भावाचेही होणार आहेत. कोकणात निवडणुका या, राणेविरुद्ध ठाकरे होतील. राणेंचे काय, राणेंना तर वैभव नाईक यांनी हरवलेले आहे, आमच्या सावंत यांनी हरवलेले आहे, त्यामुळे आम्ही शिवसैनिकच तिथे पुरेसे आहोत. तिथले विनायक राऊतच पुरेसे आहेत, त्यांच्यासोबत लढायला, असेही ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आले.

ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांना गाळून टाकू, या उद्देशाने हिंगोली लोकसभेतील शिवसैनिक कामाला लागले आहेत. यश आमचेच आहे, पण हे यश आणखी दैदीप्यमान व्हावे, यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत, लोकसभेच्या प्रचारात शिवसेना फार पुढे आहे, विजय जवळपास निश्चित आहे. हिंगोली लोकसभेचा सर्व विधानसभा निहाय आढावा घेतलेला आहे. जास्तीत जास्त मतांनी विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे, असे आवाहनही यावेळी अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आले.