कोल्हापूर प्रतिनिधी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री  यांनी आठ दिवसासाठी कोल्हापुर शहरातील निर्बंध हटवले आहेत. उद्या सोमवार (दि.५ जुलै ) पासून  अत्यावश्यक सेवांबरोबरच  इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

ही परवानगी सोमवार ५ जुलै  ते शुक्रवार ९ जुलै या कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४  या वेळासाठी  देण्यात आली आहे.   तथापि  आठ दिवसानंतर पुन्हा  परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.  त्यामुळे कोल्हापुर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत , अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे .

पालकमंत्री पाटील यांनी पुढे म्हटले आहे की,  कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्ण संख्या या बाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री  यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध आठ दिवसासाठी हटवले आहेत. असे असले तरी सर्व काही सुरू झाले आहे, असे समजून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये.  तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे जर रुग्ण संख्या वाढली तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल.  आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, याचा सुद्धा विचार सर्वांनी करावा.  त्यामुळे सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊनच कोल्हापूर शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत ,अशी विनंती पालकमंत्री पाटील यांनी केले