कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील अरविंद माने यांच्या घरातील कुटुंबप्रमुख आई यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घरातील उर्वरित सदस्य म्हणजे अरविंद माने, त्यांची पत्नी आणि दोन मुले एक चार वर्षाचा मुलगा आणि एक चार महिन्याचे बाळ यांचे स्वॅब सीपीआर रुग्णालयात चाचणीसाठी देण्यात आले.

त्यानंतर बाकी सगळ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले, मात्र चार महिन्याच्या बाळाचा म्हणजे ओमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यामुळे घरातील सर्वच सदस्य घाबरून गेले. फक्त चार महिन्याच्या बाळाला एकटे कसे ठेवणार, यामुळे संपूर्ण परिवाराने सर्व साहित्यानिशी ओमला घेऊन दसरा चौकातील व्हाईट आर्मी कोविड सेंटर गाठले. अशोक रोकडे सरांशि संपर्क करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. आणि ओमसोबत घरातील सर्वचजण पॉझिटिव्ह आल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये दाखल झाले.

सुरूवातीला ओमला ताप, सर्दी आणि खोकला होता. त्यामुळे डॉक्टर प्रकाश संघवी, बाल रोगतज्ञ यांच्यामार्फत त्याला ऑनलाइन उपचार पद्धत सुरू करण्यात आले. अवघ्या १४ दिवसानंतर ओम ठणठणीत बारा झाला. आणि त्याच्या घरीही परतला. आईच्या आणि कुटुंबाच्या मायेचा या प्रसंगाने सगळ्यांचेच डोळे पाणावले. कोविड सेंटरमधील डॉक्टर अमोल कोडोलीकर, सिस्टर हिना यादवाड, अरविंद लवटे, विनायक भाट, सिद्धेश पाटील, अशोक कुरुंदकर या व्हाईट आर्मीच्या सर्व स्टाफमुळे चिमुकल्या ओमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आली.