कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 71, 73,74,80 आणि 81 या प्रभागांमध्ये विधान परिषद सदस्य आमदार महादेव जानकर यांच्या शिफारसीतून प्राप्त झालेल्या विशेष निधीतून तब्बल पाच कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज आमदार महादेव जानकर, माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

या निधीतून प्रभागांमधील अंतर्गत रस्ते, गटर्स तसेच सभागृह उभारणीची कामे होणार आहेत. यावेळी बोलताना आमदार महादेव जानकर यांनी अमल महाडिक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. अत्यंत मितभाषी आणि संयमी स्वभावाच्या अमल महाडिक यांनी मदत केल्यामुळेच मी विधानपरिषद आमदार होऊ शकलो, या मदतीची उतराई करण्यासाठीच हा निधी दिल्याचे जानकर म्हणाले.

अमल महाडिक यांनी पदावर नसतानाही विकास कामांचा केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. आगामी निवडणुकीत जनता नक्कीच याची जाण ठेवून महाडिक यांना पुन्हा आमदार बनवेल असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. विरोधकांनी विकास कामांबद्दल पसरवलेल्या संभ्रमाचाही जानकर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. श्रेयवादाचे राजकारण बंद करा असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी या चारही प्रभागांमधील नागरिकांच्या वतीने आमदार महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका मनिषा कुंभार, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अमोल माने, रिंकू देसाई, राजू मोरे,अविनाश कुंभार, रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, अक्षय शेळके यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.