मुंबई ( प्रतिनिधी ) राज्य सरकारने नुकताच सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या निर्णयाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले.

याबाबत माध्यमांशी संवाद साधत पटोले म्हणाले की, भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली.

सध्याची नोकरी भरती मात्र खाजगी कंपनीकडून केली जात होती. सर्वात महत्वाचे म्हणजे 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते मग त्यांनी काँग्रेस सरकारचा कंत्राटी नोकर भरतीचा जीआर त्याचवेळी रद्द का केला नाही ?


आताही शिंदे सरकार येऊन दीड वर्ष झाली, या दीड वर्षात हा जीआर रद्द का केला नाही ? शिंदे सरकार सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांना तातडीने स्थगिती देऊ शकता तर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्यास एवढा वेळ का लागावा ? याची उत्तरे देवेंद्र फडणवीस यांनी द्यायली हवीत, पण फडणवीस यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली असून मी खरे कधी बोलत नाही आणि खोटे मला बोलता येत नाही ही फडणवीसांची कार्यपद्धती असल्याचं ही त्यांनी म्हटले आहे.