कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मुसळधार पाऊस पाहता पूरपरिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती शिरोळ तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे. पुराचे संकट ओढवले, तर त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याची माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवत शासन आणि प्रशासनाने दिलेले निर्देश पाळत संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी शासन आणि प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे.

धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस, पंचगंगा नदी पात्रात पाणी पातळीत होणारी चढ-उतार या घटना भीतीदायक असल्या तरीसुद्धा मागील वर्षाच्या तुलनेत शिरोळ तालुक्याच्या महापुरास कारणीभूत ठरणारे कोयना, वारणा, राधानगरी, आणि काळम्मावाडी ही धरणे त्याचबरोबर या मार्गावरील अनेक छोटी मोठी धरणे अपेक्षेपेक्षा कमी भरलेली आहेत. या सर्व धरणांमधून पाण्याचा म्हणावा तितका विसर्ग अद्याप सुरू नाही. याउलट मोठ्या पावसामुळे अलमट्टी धरणामध्ये होणारी पाण्याची आवक मोठी आहे.

अलमट्टी धरणांमधून अपेक्षेप्रमाणे विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी पुराचा धोका संभवणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यातून पूर परिस्थिती ओढवली तर प्रशासन सतर्क आहे मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्कात आहे. कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, सर्व विभाग यांच्या अधिकाऱ्यांशी आणि कर्नाटक महाराष्ट्रमधील लोकप्रतिनिशी संपर्क साधत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ तालुक्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापुराला सामोरे जाण्याची सर्व तयारी केली आहे, असेही यड्रावकर यांनी म्हटले आहे.

एनडीआरएफची तुकडी शिरोळ तालुक्यात आली असून, संकटाला सामोरे जाण्यासाठी ती सज्ज आहे. तालुक्यातील व्हाईट आर्मी आणि गावागावांमधील नावाडी सतर्क आहेत. प्रशासनाने स्थलांतराची वेळ आली तर त्याबाबतची सर्व व्यवस्था चोख केली आहे. पशुधन वेळेत सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था सुद्धा झाली आहे, असेही आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे.