कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शहाजी कॉलेजसमोर असणारा स्पीडब्रेकर चुकीचे पध्दतीने तयार केल्याने अपघातांसाठी कारणीभूत ठरू लागला आहे. गेल्या चार दिवसांत या स्पीड ब्रेकरमुळे ४ अपघातांच्या गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर शहाजी कॉलेजच्यासमोर चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर तयार केला आहे. यावर पांढरे पट्टे नसल्यानेही वाहनधारकांना स्पीड ब्रेकर दिसून येत नाही. त्यामुळे अचानक ब्रेक मारल्याने गाडी आपटून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दिवसाला येथे अपघात नित्याचे ठरलेले आहेत. मुळातच या ठिकाणी शहाजी कॉलेज, प्रेस क्लब असल्याने येथे विद्यार्थी, नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे.