राशिवडे (प्रतिनिधी) : वर्षभर वेळीअवेळी पडलेला पाऊस आणि पाटबंधारे खात्याचे योग्य नियोजनामुळे आजच्या घडीला राधानगरी तालुक्यातील सर्व धरणांत मुबलक पाणी साठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे.

तुळशी धरणाचे अभियंता विजय आंबोळे यांनी, यावर्षी अवेळी पण दमदार पावसाने सिंचनाची आवश्यकता कमी भासली त्यामुळे उपसा म्हणावा तेवढा झाला नाही. तसेच सध्या भोगावती नदीमध्ये अनेक बंधाऱ्यांची कामे, डागडुजी सुरू आहे यामुळे विसर्ग कमी प्रमाणात झाला. अशा अनेक कारणांमुळे राधानगरी धरणात सध्या 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याबरोबरच तुळशी धरणामध्ये 54, काळम्मावाडी धरणामध्ये 32,  कुंभी धरणात 41 आणि वारणा धरणात  40 टक्के  इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी पाटबंधारे खात्याने मानसून अगोदरच धरणातील पाणी साठ्याची योग्य नियोजन केल्यामुळे झालेल्या पावसात धरण योग्य वेळेत भरली. यामुळे पुराचा धोका कमी झाला होता. याही वर्षी या विभागाकडून अशाच कामाची अपेक्षा असल्याचे सांगितले.

यावेळी भोगावती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रताप माने यांनी, आम्ही विसर्गाचे योग्य नियोजन करुन पाणीसाठा नियंत्रित करीत असतो. यामुळे भविष्यात होणारी पूरहानी टाळता येते. गेल्यावर्षी अगोदर विसर्ग केल्यामुळे वीज निर्मिती होऊन अधिक फायदा झाला होता. आणि धरण भरल्यावर होणाऱ्या वीसर्गात पुरहानी होण्यावर मर्यादा आली होती. या वर्षीही आम्ही याची पुनरावृत्ती करत असल्याचे सांगितले.