कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजाराम तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे आ. ऋतुराज पाटील यांनी भेट घेऊन विकास आराखडा आणि आवश्यक निधीबाबत चर्चा केली.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, तळ्यांचे शहर अशी ओळख असणाऱ्या  कोल्हापूरमध्ये सरनोबतवाडी आणि आसपासच्या परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा करता यावा, यासाठी छ. राजाराम महाराजांनी १९२८ मध्ये ‘राजाराम तलाव’ बांधला. या परिसरातील हिरवाई आणि रम्य वातावरणामुळे हा परिसर पर्यटकांच्या पसंतीचे नवे ठिकाण बनले आहे.

तसेच शहरामध्ये रंकाळा, कळंबा आणि राजाराम तलाव येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने हे तलाव महत्वाचे बनले आहेत. राजाराम तलावासाठी चौपाटी, दोन्ही बाजूला पदपथ तसेच पर्यटनासाठी आवश्यक गोष्टी इथे उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.