गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याची (गोडसाखर) निवडणूक प्रक्रिया सुरु असून, ११ जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ५३ जणांनी २५ दुबार अर्जासह ७८ अर्ज दाखल केले. दरम्यान, आज (शुक्रवारी) शासनाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया थांबण्यात आली असून, आता छाननीसह पुढील प्रक्रिया ३० सप्टेंबरनंतर होणार आहे.

आमदार राजेश पाटील, अमर चव्हाण आदींच्या राष्ट्रवादी गटाने सवाद्य मिरवणुकीने येऊन अर्ज दाखल केले. यावेळी मिरवणुकीत स्व. आप्पासाहेब नलवडे, स्व. बाबासाहेब कुपेकर आदींची छायाचित्रे धरली होती. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

शुक्रवारी दाखल झालेल्या ७८ अर्जानंतर एकूण दाखल झालेल्या अर्जांची संख्या २६३ झाली आहे, तर त्यापैकी ४० अर्ज दुबार आहेत. सर्वाधिक अर्ज गडहिंग्लज हनिमनाळ गटातून दाखल झाले असून, त्यांची संख्या ४१ आहे. त्याखालोखाल महागाव हरळी गटातून ३६, कौलगे कडगाव गटातून ३४, भडगाव मुगळी गटातून २९, नूल नरेवाडी गटात २९, संस्था गटात १३, अनुसूचित जाती गटात १४, महिला गटात ३४, इतर मागास गटात १६ आणि विशेष मागास गटात १७ असे अर्ज दाखल झाले आहेत.