कोल्हापूर : कोल्हापूरातील सम्राटनगर येथील गोविंदराव सावंत हौसिंग सोसायटीतील व्यावसायिक राजू जयकुमार पाटील यांच्या बंगल्यामध्ये गुरुवारी दुपारी चोरी झाल्याची घटना घडली. पाटील यांचे वयोवृद्ध नातेवाईक शीतल सौदत्ते यांना दरडावून बेडरूममधील लॉकरमधून सोन्याचे 23 तोळे दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. मध्यवर्ती चौकात असलेल्या बंगल्यात घडलेल्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.

रेनकोट परिधान केलेले हेल्मेटधारी दोन चोरटे दुपारी मोपेडवरून बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले. थेट बंगल्यात प्रवेश करून किल्ल्यांचा शोध घेतला. किल्ल्या हाती लागल्यानंतर बेडरूमच्या दिशेने ते जावू लागले. वृध्द नातेवाईक सौदत्ते यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांना दरडविण्यात आले.
बेडरूममध्ये जावून कपाटातील लॉकरचे दरवाजे किल्ल्याने उघडून त्यामधील 23 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेवून चोरटे पसार झाले. चौकात थांबलेल्या काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी बंगल्याजवळ जावून पाहणी केली असता, भरदिवसा जबरी चोरीचा प्रकार उघडकीला आला.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठिकठिकाणी शोध पथके रवाना केली आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. व्यावसायिक पाटील यांच्या आर्थिक उलाढालीसह बंगला परिसराची माहिती असलेल्या संशयिताचे कृत्य असावे, असा पोलिसांचा संशय आहे.