कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर्सचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी डीएफसी सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद आणि कार्यशाळा सिंधुरेस्पिकॉन २१ एप्रिलरोजी आयोजित करण्यात आली आहे. याकरिता मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा येथील नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आराध्या अडोरर, झाराप झिरो पॉइंट याठिकाणी ही परिषद संपन्न होत आहे.

माणसाची बदलती जीवनशैली, शहरीकरण, प्रदूषण या व अशा अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस शहरी आणि ग्रामीण भागात वसनविकारांचं प्रमाण वाढत आहे. दमा (अस्थमा), सीओपीडी, इंटरस्टिशिअन लंग डिसिज, लंग कॅन्सर, अॅलर्जी या फुफ्फुसविकारांमध्ये प्रामुख्याने वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामानाने क्षयरोगाचं प्रमाण काही अंशी कमी होत आहे. लहान मुलांमध्येही अॅलर्जी, दम्याचं प्रमाण पूर्वर्वीपेक्षा वाढलेलं आढळून येत आहे. वाढत्या आयुर्मानामुळे वयोवृद्ध व्यक्तिमध्ये डायबेटिस, हृदयविकार, संधिवात या आजारांसोबतच उतारवयातील दमा (सीओपीडी) प्रामुख्याने बघायला मिळतो.

या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुफ्फुसविकार विशेषज्ञ, डॉ. सुंदिप साळवी (पुणे), डॉ. प्रल्हाद प्रभूदेसाई (मुंबई), डॉ. नितीन अभ्यंकर (पुणे), डॉ. अनिल मडके (सांगली), डॉ. मोहन पोतदार (इचलकरंजी-कोल्हापूर), डॉ. प्रवीण भट (गोवा), डॉ. अजित कुलकर्णी (कोल्हापूर), डॉ. नीलेश कोरडे (गोवा), डॉ. जगदीश डेकणे (पुणे), डॉ. हिमांशू पोफळे (पुणे), डॉ. स्नेहल गोवेकर (सिंधुदुर्ग) या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेसाठी डॉ. संजीव आकेरकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जी. टी. राणे, डॉ. संतोष जाधव, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ. वैभव आईर, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, डॉ. गौरी परुळेकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजय केसरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच डि.एफ.सी गव्र्व्हनिंग कौन्सिल व कुडाळ मेडिकल असोसिएशन (केएमए) डॉक्टर्सचे विशेष सहभाग लाभला आहे.

जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जवळपास पाचशे डॉक्टर्सचा या परिषदेमध्ये सहभाग असणार आहे. या व अशाप्रकारच्या वैद्यकीय परिषदांचा जिल्ह्यातील डॉक्टर्सना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.