मुंबई : जवळच्या मित्रानेच विश्वासघात करत इतर मित्रांच्या सहाय्याने लोअर परेल परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला असून, याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ६ आरोपींपैकी ३ आरोपी अल्पवयीन आहेत, तर ३ जण प्रौढ आहे. दरम्यान, गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी या सहाही आरोपींना तत्काळ अटक केली आहे.

ज्यानंतर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवले आहे. याप्रकरणी ३ प्रौढ आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोर्टाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात अल्पवयीन आरोपींपैकी एक जण हा संबंधित मुलीच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे. २३ डिसेंबर रोजी तो मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन. एम. जोशी पोलीस करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुंबई पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून, ते एकमेकांना ओळखत होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा ही घटना उघडकीस झाली तेव्हा त्यानंतर पीडित कुटुंबीयानी तात्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

महिलेवरही सामूहिक बलात्कार

मुंबईमध्ये याच महिन्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तीन नराधमांनी अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडत एका ४२ वर्षीय महिलेवर अत्याचार केले. या तिघांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके दिले होते.