मेलबर्न : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ही लढत मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. गेल्या वर्षी युएईमध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती आणि तेव्हा भारताचा १० गडी राखून पराभव झाला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित आणि कंपनी मैदानात उतरले. दिवाळीच्या आदल्या दिवशी या दोन पारंपरिक संघादरम्यान होणाऱ्या हाय होल्टेज सामन्याची उत्सुकता क्रिकेट विश्वाला लागली आहे.

ऑस्ट्रेलियात सध्या पावसाचा हंगाम आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना देखील पावसामुळे रद्द करावा लागला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ तारखेला होणाऱ्या लढतीत देखील पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी मेलबर्नमध्ये दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल तर ऑस्ट्रेलियन वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता मॅच सुरू होईल. ताज्या हवामानाच्या अंदाजानुसार, आता पाऊस पडण्याची शक्यता ५० ते ६० टक्के आहे. यापूर्वीच्या अहवालानुसार पाऊस पडण्याची शक्यता ८० ते ९० टक्के वर्तवण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून आतापर्यंत पाऊस पडलेला नाही. म्हणजेच हवामानात खूपच सुधारणा झालेली आहे.

२०१९ च्या वर्ल्डकपमध्ये मध्ये जेव्हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यादरम्यान पाऊस सुरू झाला तेव्हा ती लढत पुढील दिवशी खेळवण्यात आली होती; पण आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळेच जर पावसामुळे ही लढत २३ तारखेला झाली नाही तर ती रद्द होईल आणि दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत झाली नाही तर चाहत्यांसाठी मोठा झटका असेल. दोन्ही संघात द्विपक्षीय लढत होत नाही, फक्त आयसीसीच्या स्पर्धेत सामने होतात. गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकपनंतर या वर्षी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सामने झाले होते.

दरम्यान, सरावाच्या वेळी पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद जखमी झाला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर शुक्रवारी नेट सत्रादरम्यान टॉप ऑर्डरचा फलंदाज शान मसूदच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. ‘शान मसूदचे सर्व न्यूरोलॉजिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत, असे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने निवेदनात म्हटले आहे.