कोल्हापूर (प्रतिनिधी) :  न्यू दिल्ली येथील अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची बिनविरोध निवड झाली.

अ.भा.फुटबॉल फेडरेशनची सन २०२२ ते २०२६ या चार वर्षांकरिता कार्यकारिणी मंडळासाठीची निवडणूक आज झाली. फेडरेशनच्या घटनेनुसार एकूण २३ जणांची कार्यकारिणी समिती असून, त्यामध्ये १७ सदस्यांची (अध्यक्ष, उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष) निवड देशातील संलग्न असणाऱ्या ३५राज्यांच्या एक प्रतिनिधीमार्फत केलेल्या मतदानाद्वारे करण्यात आली. याशिवाय देशातील प्रख्यात खेळाडूंमधून ६ सदस्यांची कार्यकारिणी नेमणूक करण्यात येणार आहे.

आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष- कल्याण चोबे, उपाध्यक्ष- एन.ए. हरिस व कोषाध्यक्ष- किपा अजय हे बहुमताने निवडून आले. कार्यकारिणी सदस्य म्हणून मालोजीराजे छत्रपती व जी.पी.पलुंगा, अविजीत पॉल, अनिलकुमार पी., वळंका नताषा एलिमॉ, मेनला इथेंपा, मोहन लाड, अरिफ अली, के. नेबो सेखोसे, ललंगहिग्लोवा हमर, दीपक शर्मा, विजय बाळी, सय्यद हुसेन, सय्यद अली नक्वी यांची बिनविरोध निवड झाली.

न्यू दिल्ली येथील ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये देशातील ३५ राज्यांच्या प्रतिनिधींनी आज मतदान केले. महाराष्ट्र राज्यातून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंट मालोजीराजे छत्रपती यांचे नाव दिले होते. मालोजीराजे छत्रपती यांनी गेली १५ वर्षांपासून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून फुटबॉल क्षेत्रात कार्यरत राहून देशातील नामवंत आय लीग, ओएनजीसी सेकेंड डिव्हिजन, नॅशनल वुमन्स लिग, आंतरराष्ट्रीय भारत विरूद्ध हॉलंड वुमन्स मॅच यांचे आयोजन करून फुटबॉल खेळाची लोकप्रियता असणाऱ्या कोल्हापूरचे नाव जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्यांच्या निवडीने कोल्हापूरला हा पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे. केएसएचे पेट्रन-इन चीफ शाहू छत्रपती महाराज यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.