कागल (प्रतिनिधी) : कागल नगरपरिषद, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स व सार्थ एज्युकेशन सोसायटी यांच्या सहयोगाने कै. उत्तमराव पाटील उद्यानात देशातील एक नंबर जैवविविधता परिसर साकारेल. हे देशातील चांगले पर्यटन केंद्र बनेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ते लक्ष्मी टेकडी जवळील कै. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान पुनरुज्जीवन कामाच्या शुभारंभावेळी बोलत होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या धोरणानुसार जैव विविधता उद्यानासाठी नगरपालिकेने फॉरेस्टला 140 एकर जमीन दिली होती. मात्र शासनाने हा प्रकल्प बंद केला. पालिकेला 140 एकर जमिनीचे देखभाल करणे शक्य नव्हते. यासाठी सीएसआर फंडातून याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला होता. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीने पुढाकार घेऊन ही जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला यासाठी कंपनीचे आभार मानतो.
तसेच किर्लोस्कर कंपनीने आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. किर्लोस्कर कंपनीशी आता तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. या तीन वर्षात कंपनीने चांगले डेव्हलप केले तर पुढील 30 वर्ष हा करार कायम करू, असेही त्यांनी सांगितले .
किर्लोस्कर कंपनीचे एचआर हेड वीरेंद्र गायकवाड म्हणाले, किर्लोस्कर कंपनीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. कंपनीचे कागल नगरपरिषदेला पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
शरद आजागेकर म्हणाले, या जैवविविधता उद्यानचे तीन टप्प्यात काम करणार आहोत. प्रथम साफसफाई, नादुरुस्त झालेले मशीन्स दुरुस्त करणे. कोणतेही झाड न तोडता चांगली झाडे या ठिकाणी लावू. किर्लोस्कर कंपनीचा परिसर जसा नटलेला आहे तसे हे उद्या नटवू. हे उद्यान पर्यटनाच्या बाबतीत देशात एक नंबरचे करू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भैय्या माने, सुरेश मगदूम, हरिष सायवे, डॉ. दिलीप माळी, नवल बोते, प्रवीण काळबर, दत्ता पाटील केनवडेकर, सौरभ पाटील, अस्लम मुजावर, ॲड . संग्राम गुरव, संजय चितारी, अर्जुन नाईक, सतीश वड्ड, नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.