मुरगूड (प्रतिनिधी) : गळीत हंगामाच्या प्रारंभाची चाहूल लागताच जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. यंदाचा हंगाम हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे काहीसा उशिराने सुरू होत असला तरीही कारखान्यांनी तयारीला सुरुवात केली असून, ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कारखान्यांच्या कार्यस्थळी दाखल होऊ लागल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो ऊसतोड मजूर महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण विभागासह कर्नाटक व मध्यप्रदेश या सीमावर्ती राज्यांतून साखर पट्ट्यात दाखल होत आहेत. त्यांची निवास, भोजन व्यवस्था, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने कारखान्यांनी नियोजनबद्ध तयारी केली आहे. आवश्यक यंत्रसामग्रीची तपासणी, देखभाल व अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्यात आणले असून, काही कारखान्यांनी कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे.