कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दारुच्या वादातून झालेल्या मारहाणीचा मित्रासोबत जाब विचारण्यासाठी गेले असता वाल्मिकी घडसे (कोळी) याने दोघांना कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. यामध्ये बाळासो शामराव देसाई व सुनिल कुमार मगदूम असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपीच्या घरी ही घटना घडली. जखमींवर इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीची फिर्याद बाळसो देसाई यांनी येथील पोलिसांत दिली आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी दोघेही एकाच गावचे असून मित्र आहेत. चार दिवसांपूर्वी दारु पिण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी आरोपी घडसे याने देसाई याच्या कानशिलात मारली होती. त्यामुळे देसाई याने शुक्रवारी आपला मित्र मगदूम याला घेवून आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता वादावादी होवून आरोपी घडसे याने दोघांवरही कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.