कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सर्वांना आपलेपणाने सोबत घेऊन जाण्याची हातोटी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणण्याची किमया ते करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत आहे, असे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले. कोल्हापूर जिल्ह्याची ही प्रेरणा घेऊन राज्यभरात राजकीय परिवर्तनाची किमया सुरू आहे, असेही ते म्हणाले.

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील व शिवसेना- एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार तटकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी मंत्री हसन मुश्रीफ होते.

भाषणात तटकरे म्हणाले, बहुजन समाजाचे हित साधायचे असेल तर सत्तेमध्ये सहभाग ठेवला पाहिजे, हा विचार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिला. त्यामुळे सन 2023 मध्ये एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र घडणार आहे. पाटील आणि जमादार हे विकासाचा दृष्टिकोन ठेवून पक्षामध्ये आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे केवळ कागलच नव्हे तर जिल्ह्यातील पक्षाची ताकद अधिकच मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हा हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेची विचारधारा जपणारा पुरोगामी जिल्हा आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यामुळे पक्षाला बुलडोझर आणि जेसीबीचे बळ मिळाले आहे. पक्षात येऊन चूक केली असे त्यांना वाटणार नाही, असा योग्य तो मानसन्मान आणि विश्वासही देवू. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याची मी शपथ घेतली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष असेल.

गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील म्हणाले, “माझं आयुष्य गोकुळच्या कामगिरीशी अतूटपणे जोडलेलं आहे. गोकुळच्या स्थापनेपासून मी संचालक मंडळाचा भाग होतो आणि जवळपास ४३ वर्षे मी गोकुळमध्ये संचालक म्हणून कार्यरत राहिलो. या काळात गोकुळला सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे, दूध उत्पादकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवणारे निर्णय घेता आले, हीच माझ्यासाठी खरी शिदोरी आहे.

मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले,”आयुष्यात अनेक चुका झाल्या. काही निर्णय चुकले, काही वेळा परिस्थिती विपरीत होती. त्याचंच फलित म्हणजे १२ वर्षांचा वनवास माझ्या वाट्याला आला. हा काळ कठीण होता, पण त्यातून खूप काही शिकायला मिळालं. आज मुश्रीफ साहेबांसोबत पुन्हा उभा राहिलोय, हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला, त्याला मी पात्र जीवात जीव आहे तोवर मुश्रीफ साहेबांबरोबर राहणार आहे.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, संजय तटकरे, सिद्धार्थ कांबळे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे, सुनील चौगुले, रणजित मगदूम दत्ता पाटील – केनवडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्यासह बजरंग सोनुले, संतोष वंडकर, अशोक खंडागळे, दत्तात्रय जाधव, किरण कुंभार, पद्मसिंह पाटील, विश्वजीतसिंह पाटील, संभाजी पाटील – बेलवळे बुद्रुक, मधुकर करडे – नंद्याळ, दत्तात्रय पाटील – बेलवळे खुर्द, बबन शिंत्रे बाजीराव चांदेकर, आर. के. लाडगावकर – अर्जुनवाडा, आनंदा थोरवत – कुरणी, अनिल पाटील, तसेच माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यासह माजी नगरसेवक विशाल सूर्यवंशी, अमर सनगर, सचिन मेंडके, राजेंद्र भारमल, बबन मोरबाळे, आकाश दरेकर, प्रकाश हळदकर, समाधान बोते, राजेंद्र खैरे, फिरोजखान जमादार, विक्रमसिंह घाटगे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.