टोप (प्रतिनिधी) : पाच वर्षांचा संसार आणि दुसऱ्या अपत्याच्या तपासणीसाठी गरोदर महिला दवाखान्यात गेली… मात्र, ती अल्पवयीन माता असल्याचे आढळली. त्यामुळे कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयातील डॉक्टरांनी दुसऱ्यांदा बाप होणाऱ्या बापावर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना करवीर तालुक्यातील शिये येथील आहे. याबाबत शिरोली पोलिसांमध्ये काल (मंगळवार) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. आज पतीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाला पाच वर्षे होऊन दुसऱ्यांदा आईबाप होणाऱ्या दांम्पत्य बाळाच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयात गेले होते. याचवेळी डॉक्टरांना आईचे वय १७ वर्षे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी समाज कल्याण विभाग, महिला दक्षता समितीआणि शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. यावेळी पतीवर शिरोली पोलिसांमध्ये पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयातील डॉक्टर निलिमा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच ही माता शरीराने कमकुवत आणि अशक्त आहे. कायद्याने लग्नासाठी वयाची अट घातली असून या कमी वयाच्या मातेच्या आणि बाळाच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन संबंधित खात्यांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.