उचगाव ( प्रतिनिधी ) : नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवावे; असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे गांधीनगर पोलिसांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर दक्षिण भागातील उचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी भागांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना हेरुन त्यांना नशील्या पदार्थ्यांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. रविकिरण इंगवले म्हणाले, शाळा, ओसाड जागा, नदी, तळे अशा ठिकाणी नशेचे पदार्थ विक्री करणारे लोक आढळतात. पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी.

विक्रम चौगुले म्हणाले, “नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्यांची नावे सांगणाऱ्या पालक, नागरिकांची नावे गुप्त ठेवावीत आणि नशिले पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.’ यावेळी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे म्हणाले, ‘पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून जनतेनेही सहकार्य करावे.”

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विराग करी, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, महेश खांडेकर, जितू कुबडे, अक्षय परीट, आकाश शिंदे, प्रमोद शिंदे, राम पाटील, अजित पाटील, दीपक धिंग, दीपक पोपटानी, सुनील पारपानी, दीपक फ्रेमवाल, शिवाजी लोहार, आनंद कदम, अक्षय गाडगीळ, ओंकार फराटे, धनंजय पाटील, गजानन यडूरकर, शाकीर शिकलगार, दीपक शिंदे, विनायक पोवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.