गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बँकेच्या मशिनमध्ये भरणा केलेल्या बनावट नोटा प्रकरणातील टोळीला नोटा पुरवणार्या तापसकुमार नरेंद्र प्रधान (वय 35, सध्या रा. कटक, ओडिशा) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचे कनेक्शन आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट झाले होते.
गडहिंग्लजमधील आकाश रिंगणे याने 17 जून 2025 रोजी येथील एका बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये त्याच्या खात्यावर 500 रुपयांच्या 35 बनावट नोटा भरल्या. त्यानंतर बँकेने पोलिसांत धाव घेतली होती. नंतर गडहिंग्लज पोलिसांनी तपासाची पथके तयार करून आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती. यामध्ये रिंगणे याच्यासह नितीन भैरू कुंभार (रा. गडहिंग्लज), अशोक महादेव कुंभार (रा. चिक्कोडी, जि. बेळगाव), दिलीप सिद्धाप्पा पाटील (रा. बिद्रेवाडी, जि. बेळगाव), सतीश बसप्पा कणकणवाडी (रा. याडगूळ, जि. बेळगाव), भरमू पुंडलिक कुंभार (बसवानगडी, जि. बेळगाव) यांचा समावेश आहे.
यातीलच अशोक कुंभार याचा मुलगा अक्षय हा प्रधान याला यूपीआय अॅप वापरून पैसे पाठवत असे. ही माहिती मिळताच पोलिसांनी जवळपास 4 हजार 500 कि.मी.चा प्रवास करून ओडिशा गाठले. तेथील बँकेतून प्रधान याचा पत्ता, फोटो व मोबाईल नंबर मिळविला. लोकेशनवरून त्याचा पत्ता शोधला आणि रेकी करून राहत्या फ्लॅटमध्ये प्रधानच्या मुसक्या आवळल्या. प्रधानवर यापूर्वी बंगळूर येथे गांजाचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. तेथील जेलमध्येच त्याची अशोक कुंभारशी ओळख झाली. यातून त्याने बनावट नोटा खपविण्यास सुरुवात केल्याचे तपासात समोर आले आहे.