कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी कामगिरी करत रु. १,२२,०००/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार नुसार फिर्यादी कन्हैया बळवंत पोवार (वय २७, रा. हेरवाड ता. शिरोळ) यांच्या हेरवाड येथील राहत्या घरातून 9 मे रोजी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती. चोरट्याने घराचा दरवाजा उघडून, घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सेप्टी लॉकरची चावीने उघडून रु. १,०७,०००/- किमतीचे सोन्याचे दागिने (सोन्याची तुशी, कानातील सोन्याचे वेल, सोन्याची अंगठी) चोरून नेले होते गोपनीय माहितीच्या आधारे, हेरवाड येथील प्रविण वसंत चिंदरकर (वय २६) यानेच सदर चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रविण चिंदरकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने केवळ सदर गुन्हाच नव्हे, तर कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एका घरफोडीची कबुली दिली.
प्रविण चिंदरकर याच्याकडून दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण रु. १,२२,०००/- किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या पथकाने धडक कारवाई केली. या पथकात पो कॉन्स्टेबल अनिल चव्हाण, संतोष साबळे, सागर खाडे, अविनाश जडे, सचिन पुजारी आणि नितीन साबळे यांनी ही यशस्वी कारवाई केली.