कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण खून प्रकरणी पोलिसांनी आणखीन एका आरोपीला अटक केली असून या खूनात आरोपींची संख्या चार झाली आहे. निशांत नरेश वाडेकर (वय १९ रा.नृसिंहवाडी) असे त्याचे नाव आहे. या चारही आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदल्या दिवशी मारहाणीचा राग धरून आणि रागाने पाहिल्याचे निमित्त करुन मुख्य आरोपी यश काळे यांने इतर तीन साथीदारांच्या मदतीने रविवारी मध्यरात्री चाकूने भोसकून खून केला होता. खून करुन फरारी झालेल्या आरोपींना अवघ्या कांही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिये फाटा रस्त्यावर पाठलाग करुन काळे याच्यासह अमन दानवाडे आणि श्रीजय बडसकर याला ताब्यात घेतले होते. या खूनात आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने पोलिसांनी वाडेकर याला नृसिंहवाडी येथील त्याच्या घरातून अटक केली. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.