कानोली (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच कानोली ता. आजरा येथील कानोली सहकारी विकास सेवा संस्थेची स्थापना झाली. कानोलीसारख्या छोट्याशा गावात स्थापना होऊनही गेल्या ७५ वर्षांची या संस्थेची वाटचाल गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या संस्थेने शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत- जास्त कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, असेही ते म्हणाले. ते कानोली सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी दोनच वर्षे झाली असताना या गावातील लोकांना एखाद्या विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतीला अर्थपुरवठा करता येईल असं वाटलं. त्या विचारातूनच या संस्थेचा जन्म झाला. कै अमृतकाका देसाई यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्य केले. एवढ्या छोट्याशा गावात आजघडीला दीड कोटी रुपयांचा अर्थपुरवठा होत आहे. दीड लाख नफा आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ९९ टक्के वसुली आहे. या बाबी कौतुकास्पदच आहेत. अशा सर्वच विकास सेवा संस्थांच्या पाठीशी केडीसीसी बँक हिमालयासारखी उभी राहील. केडीसीसी बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शेतकरी कल्याणाच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करा, असेही ते म्हणाले.
तसेच कागल विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघात विकासकामांच्या निमित्ताने आम्ही एक आदर्श निर्माण केला आहे. अलीकडेच कानोलीसह पंचक्रोशीतील दहा गावांचा भाग उत्तूर मतदारसंघांमध्ये समाविष्ट झाला आहे. या भागातही नियोजनपूर्वक विकास योजना राबवणार असल्याचे सांगितले.
केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, आजरा तालुक्यातील उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघ मंत्री मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहे. या जिल्हा परिषद मतदार संघात कानोलीसह सुलगाव, चांदेवाडी, मुंगूसवाडी, खेडे, हजगोळी बुद्रुक, हाजगोळी खुर्द, पेद्रेवाडी, कोवाडे, निंगुडगे, गजरगाव, सरोळी ही गावे अलीकडेच समाविष्ट झालेली आहेत. विधानसभा मतदारसंघांच्या नव्या पुनर्रचनेत येत्या विधानसभा निवडणुकीला आजरा तालुका मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट व्हावा, म्हणजे या भागाचे नंदनवन होईल.
यावेळी गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुळे, केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे , संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण देसाई, परशुराम आपगे, सुधीरकुमार पाटील, संभाजी आपगे, बाबुराव पाटील, राजेंद्र पाटील, विलास मुरकुटे, श्रीपतराव देसाई, पांडुरंग भोसले, रमेश भोगण, मारुती पाटील, पंडित पाटील, विठ्ठलराव देसाई, राजेंद्र जोशीलकर, दीपक देसाई, काशिनाथ तेली, हरिभाऊ कांबळे, अनिकेत कवळेकर, रशीद पठाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.