मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या खासदारांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि राष्ट्रपती निवडणूक या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सोमवारच्या बैठकीला एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार बैठकीला उपस्थित, तर ७ खासदार गैरहजर होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे एक-दोन नव्हे, तर तब्बल १४ खासदार बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. लोकसभेतल्या वेगळ्या गटासाठी ते अध्यक्षांना साकडे घालणार असल्याची माहिती आहे. बंडाच्या तयारीत असणारे सर्व खासदार एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे ते वेगळी वाट चोखाळणार असल्याचे समजते.

या पत्रात ते म्हणतात की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद दिला आणि महाराष्ट्राची कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवडणुकीत पाठिंबा दर्शविला होता. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करतही शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला. आताही शिवसेनेने हीच परंपरा कायम ठेवावी. आदिवासी समाजातील एका कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. त्यासाठी पक्षाच्या खासदारांना आदेश द्यावा.

राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. भाजप प्रणित एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १७ जुलै २०१७  रोजी झाली होती.