सांगोला/ नाना हालंगडे –
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
सांगोला तालुक्यातील 389 जिल्हा परिषद शाळांपैकी 56 शाळांच्या वर्ग खोल्या धोकादायक बनले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन शेजारील जुन्या इमारतीचा स्लॅब व कॉलम अर्थात पोल चा काही भाग कोसळण्याच्या मार्गावर असल्याने, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पावसाळ्या नंतर तरी शाळांच्या खोल्या दुरुस्त होतील का?, असा प्रश्न उपस्थित होत असताना मात्र, जिल्हा शिक्षण विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सांगोला तालुक्यात धोकादायक खोल्या असलेल्या शाळांमधील अनेक खोल्यांना तडे जाणे, छत गळणे, छातातून पावसाचे पाणी येणे यासारखी स्थिती आहे. या परिस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पध्दती सुरू केली असताना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज खोल्या असणे आवश्‍यक आहे. मात्र, झेडपीच्या काही शाळांमध्ये धोकादायक स्थितीत शिक्षण सुरू आहे. अशी परिस्थिती असताना, सांगोला शहरातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद तसेच त्याच ठिकाणी उर्दू शाळा यासह अंगणवाडी शाळा भरत आहे. अशा जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 या शाळा परिसरातील जुनी इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे दररोज या इमारतीचा काही भाग कोसळत आहे. आणि याच इमारतीखाली जिल्हा परिषद शाळा एक व दोन मधील विद्यार्थी ये-जा करीत आहेत.

याबाबत शिक्षकांनी शाळांच्या स्थितीबाबत शिक्षण विभागाला माहितीही दिली आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळत नाही. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम कालबाह्य झाल्याने दुरवस्था झाली आहे.
शिक्षण क्षेत्रात देखील मोठ मोठ्या स्पर्धा निर्माण झाल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील त्याच पद्धतीने तोडीस तोड शिक्षण पद्धती उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटल आणि अत्याधुनिक युगात विद्यार्थी सर्वांगीण बाजूने घडले पाहिजे याकरिता जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रयत्नशील असून, तालुक्यात लोकसहभाग च्या माध्यमातून बहुतांश शाळा डिजिटल आणि आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे मात्र तालुक्यातील धोकादायक शाळांची परिस्थिती देखील विद्यार्थ्यांना धोक्याची घंटा देताना दिसून येत आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून व सांगोला तालुका शिक्षण विभागाकडून तात्काळ उपाययोजना करून ना दुरुस्त आणी धोकादायक शाळा दुरुस्ती करून घ्याव्यात अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे