पुणे : भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेली एक महिला आणि ४ मुलं बुडाली होती. यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये एका महिलेचा आणि एका लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातून वर्षा पर्यटनासाठी हे कुटुंब आलं होतं.

गेल्या चार पाच दिवसांपासून मुंबई परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर कपाऱ्यांवरील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. लोणावळा हे मुंबई आणि पुणे शहरातील पर्यकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो. दरम्यान, संतधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅमवर आजच ओव्हर फ्लो झालं होतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान आज पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आलं होतं. भुशी धरण परिसरात असलेल्या वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले होते. त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. महिला आणि एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. इतर ३ मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.