कुरुंदवाड (प्रतिनिधी) : नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर औरवाड पाणवठ्यावर मध्यरात्री बेसुमार वाळू चोरी तस्करांकडून केली जात होती. याबाबत तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने कारवाई करीत १० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

पर्यावरण विभागाने नदी पात्रातून वाळू उपशास बंदी घातली असताना देखील नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर औरवाड पाणवठ्यावर मध्यरात्री बेसुमार वाळू चोरी तस्करांकडून केली जात होती. वाळू चोरी तक्रार करून देखील महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात नव्हती. याबाबत तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर मंडल अधिकारी बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. यावेळी वजीर बाबा दर्गा परिसरात असणारे वाळूचे साठे जप्त करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने ८ ते १० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. यावेळी पाणवठ्यावर जाणाऱ्या मार्ग जेसीबीने उखडून बंद करण्यात आला आहे.

ही कारवाई मंडल अधिकारी बबन पाटील, तलाठी ए. एस. खराडे, पोलीस नाईक अमित प्रधान, पोलीस कॉ. सद्दाम शेख आदींनी केली.