कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी -पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील युवानेते योगीराज गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, योगीराज गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
योगीराज गायकवाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहोत. माजी आमदार स्वर्गीय संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर जनता पोरकी झाली होती. त्यांच्याप्रमाणेच मंत्री मुश्रीफ यांच्या कामाची पद्धतही गोरगरीब जनतेला केंद्र मानून आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी उत्तम पाटील (सुपात्रे), विद्यानंद यादव (बांबवडे), विजय पाटील (थेरगाव), संदीप केमाडे (सैदापूर), शिवाजी गावडे (वालूर), सुभाष पाटील (पिशवी), सुभाष कांबळे (भाततळी), बाबू कांबळे (शेंबवणे), रावजी कांबळे (मांजरे), भास्कर कांबळे (घोळसावडे), अजित पिंपळे (पिंपळेवाडी), प्रमोद घाडगे, सागर आळवेकर, भाऊसाहेब घाडगे आदी उपस्थित होते.