कोल्हापूर : मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक हे लोकसभेच्या रिंगणात विरोधात उभे होते.राजकीय घडामोडीमुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म बाजूला सारून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्न केला होता. सध्या संजय मंडलिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे महायुतीत आहेत. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. त्यामुळे ते माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे गेलो नाही’, असा अप्रत्यक्ष टोला महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राजकीय गरज होती. मी शिवसेना आणि भाजपचा उमेदवार होतो. त्यामुळे आम्ही कोठे जावे हा विषय नव्हता, तर तेच आमच्याकडे आले होते, अशा शब्दांत मंडलिकांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. विरोधकांकडून मी कुठे दिसत नाही,लोकांच्यात मिसळत नाही  म्हणून टीका केली जाते.लोकांच्यात मिसळत नाही म्हणून  कोल्हापूर जिल्हा बँकेला निवडून आलो का?, ‘गोकुळ’मध्ये पॅनेल असेच विजयी केले का ? विधानसभा निवडणुकीवेळी ‘दक्षिण’मध्ये ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात कोण होते?, त्यामुळे हे सर्व मी कोठे दिसत नाही म्हणून किंवा लोकांमध्ये जात नाही म्हणून दिले का?’ असा सवालही मंडलिक यांनी यावेळी केला.