मुंबई (प्रतिनिधी) : मी शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली, त्यावरुन सोशल मीडियावर फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली ? हे समजून घ्यायचे असेल, तर पवारांची ६१ भाषणं वाचली पाहिजेत.  जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते, त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल, माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली ?, असे उत्तर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला दिले.   

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असणारे ‘नेमकचि बोलणे’, या पुस्तकाचे आज (शनिवार) मुंबईत प्रकाशन झाले. याप्रसंगी    संजय राऊत यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जोरदार फटकेबाजी केली.

राऊत पुढे म्हणाले की, आपल्या देशातील विकृत राजकारणावर शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून ताशेरे ओढले आहेत. भाजपला देशाचे ऐक्य नको आहे, हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत, की भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.