कळे ( प्रतिनिधी ) शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरती कळे-मरळी ( ता.पन्हाळा ) दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन बुधवार दि. 18 रोजी. सकाळी 11 वा. करण्यात आले. या ठिकाणी उपअभियंता आर.बी.शिंदे व प्रकल्प व्यवस्थापक विवेकानंद देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यात कळे-कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट व धिम्यागतीने सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थी व गर्भवती महिलांना नाहक त्रास होत आहे.

या रस्त्यासाठी लागणाऱ्या मुरुमाची वाहतूक कळे बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावरून होत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. धुळीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. 

              
या आंदोलनामुळे कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. घटनास्थळी कळे पोलीस ठाण्याचे सपोनि. रणजीत पाटील यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार, पन्हाळा तालुकाप्रमुख कृष्णात कदम, गगनबावडा तालुकाप्रमुख सतीश पानारी, शेतकरी सेना जिल्हा संघटक रणधीर पाटील, उपतालुकाप्रमुख प्रशांत पोवार आदीसह गगनबावडा, पन्हाळा, शेतकरी सेना, अंगीकृत संघटना, व्यापारी वर्ग व शिवसैनिक उपस्थित होते.