कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची साथ सोडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. यानंतर त्यांनी मंत्रिपदही भूषवले. मंत्रीपद गेल्यानंतरचं दु:खं काय असतं हे सदाभाऊंनी बेमालूमपणे मांडलं. मंत्री होतो तवा जेवायला बोलवायचे. आग्रहावर आग्रह करायचे. आता चहा बी पाजत नाहीत, असं सदाभाऊ यांनी म्हणताच अनेकांना हसू आवरेना झालं. पण हसता हसता डोळ्याच्या कडाही पाणवल्या.माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. बोलण्यात हायगय करायची नाही मी ही बोलतच होतो. हातकणंगले मीच लढवणार, पण मी नाही म्हणलं तर माणसं माझ्यासोबत राहतील का? लोक मला विचारायचे की भाऊ कसं काय? मी म्हणायचं जमलं. मात्र मला माहीत होतं जमलेलं नाही, असं  सदाभाऊ  यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

सदाभाऊ खोत नेहमीच आपल्या रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत ते विरोधकांवर टीका करीत असतात. दु:ख, वेदना मांडतानाची त्यांची स्टाईलही अगली वेगळी असलेली दिसून येते. आपल्या खास आणि खुमासदार शैलीत ते असं काही सांगून जातात की हसता हसता मनाला चटका लागतो. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे  अशावेळी सदाभाऊ यांच्या भाषणाची चर्चा  तर होणारच.कोल्हापुरात सदाभाऊंनी आपल्या खुमासदार रांगड्या शैलीत भाषण केलं.

माझी गाडी आली की दहा गाड्या यायच्या –

सत्ता लय वाईट असते. मी भोगली आहे. माझी गाडी आली आणि हॉर्न वाजायला लागला की मागून दहा गाड्या यायच्या. प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर रांगा लागायच्या. मला वाटायचं आपलं वजन वाढायला लागलंय. मंत्रीपद गेलं आणि गडी बी गेली आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिलो, असं सदाभाऊ यांनी म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला.