कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2022 पर्यंत केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती. मात्र, 2022-23 या वर्षात काढण्यात आलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची अट घातली आहे. शिवाय केवळ 50 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्यात येणार असल्याचे नमुद आहे.


परिणामी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे 2023 मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील, आ.पी. एन. पाटील, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगांवकर व आ. राजू आवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

पत्रात म्हटले आहे की, 2019 ते 2021-22 या कालावधीत सरसकट फेलोशिप दिली.पण 2023 मधील नोंदणीकृत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकपासून फेलोशिप मिळावी, 2023 मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी, सरसकट फेलोशिपचा निर्णय होईपर्यंत सीईटी परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर विचार करून शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करावी.