महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात जवळ जवळ सहा – सात दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित आहे.  राजकारणात तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही असं म्हणावं लागेल. त्यांच्या प्रत्येक कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेले आहे.

राष्ट्रीय पातळीवर अनुभव आणि कृषी, उद्योग, खेळ, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची खडान् खडा माहिती असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे, की आपल्याकडे राजकीय मतभेद असतात; परंतु मनभेद कधीच नसतात. सुरुवातीपासूनचे हे ‘कल्चर’ आजही कायम आहे. शरद पवार साहेबांचा अनेक विषयांतील अभ्यास, अनुभव लक्षात घेता, त्यांच्याकडे सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. अशा या अनुभवी आणि चलाख योध्याला आज ८१ वर्ष पूर्ण झाली.

पवारांच्या जीवनातील काही राजकीय घटना

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८च्या मध्यापासून. काँग्रेसमध्ये बंड घडवून आणत, जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. खरंतर शरद पवार यांचे जीवन हे अनेक घटनांनी ओतप्रोत भरलेले आहे. १९६७मध्ये ते राज्याच्या राजकारणात विधानसभेचे आमदार म्हणून आले. त्या अगोदरही ते युवक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांची कामाची पद्धत, जनसंपर्क ठेवण्याची कला, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीतच शरद पवार लोकप्रिय झाले.

२००४ ते २०१३ असे एक दशक ते देशाचे कृषिमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात देशाने पहिल्यांदाच २६५ दशलक्ष टन अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाचे लक्ष्य गाठले. भारताला फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचविले. दूध व केळी उत्पादनात जगात पहिला क्रमांक पटकाविला.

 

‘राजकारणातील मुरब्बी’ म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. २०१९मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेली विधानसभा निवडणूक आपण सर्वांनी पाहिली. यावेळी भाजपा-शिवसेना महायुतीचा रथ रोखणे अवघड असताना, विरोधक नावाला तरी उरतील की नाही, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु शरद पवारांनी निकराने लढा दिला. साताऱ्यामधली त्यांची पावसाची सभा नवी ऊर्जा देऊन गेली आणि विरोधकांचे संख्याबळ काही प्रमाणात का होईना वाढले. २०१९मध्ये शिवसेनेला महायुतीतून बाहेर घेऊन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे असो, शरद पवारांनी राजकीय डावपेच यशस्वी करून दाखवले. ज्या वयात आराम करायचा, घरात बसायचे, त्या वयात पवार साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत. सगळ्या आव्हानांना उत्साहाने सामोरे गेलेले शरद पवार आपण पाहतो आहोत. भलेही पवार साहेबांबरोबर राजकीय मतभेद असतील; पण त्यांचा हा उत्साह, त्यांची ऊर्जा आणि कामाचा उरक आपल्या सर्वांना निश्चितपणे प्रेरणा देतो.