कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने २०० मीटर ते ६.०१ कि.मी. पर्यंत विस्तारित क्षेत्र करुन जिल्ह्यातील २६ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ गावांचा समावेश संवेदनशील क्षेत्रात करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द केली असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.
शासनाने १६ सप्टेंबर १९८५ रोजी अधिसूचना काढून ३५१.१६ चौ. किलोमीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. १९८६ ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सीमेपासून १० किलोमीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे लोकांवर बंधने आली. कोल्हापूर जिल्ह्यातील २६ गावे १५, ०३९ हेक्टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील १५ गावे १० हजार २६ हेक्टर क्षेत्र असे एकूण २५, ०६६ हेक्टर क्षेत्रावर इको सेन्सिटिव्ह झोन प्रस्तावित करुन ९ ऑक्टोबर २०१९ ला केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. त्यावर १५ ऑक्टोबर २०२० रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने २०० मीटर ते ६.०१ कि.मी. पर्यंत निश्चित केला. त्यामुळे राधानगरी अभयारण्यापासून १० किलोमीटरच्या गावांमध्ये असणाऱ्या बंधनापासून सुटका मिळाली असल्याचे सांगून वनसंरक्षक चव्हाण यांनी सांगितले.
राधानगरी वन्यजीव अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, जंगली कुत्रे, शेकरु, गवा, पटेरी वाघ, हत्ती आदी आढळतात. अभयारण्याच्या विस्ताराचे क्षेत्रफळ २५०.६६ चौ. कि. मी. आहे. या क्षेत्रामध्ये व्यावसायिक उत्खनन, प्रदूषण उत्पन्न करणारे उद्योग, जल विद्युत प्रकल्प, लाकूड गिरण्या, वीटभट्टी, प्लॅस्टिक पिशव्यांचा उपयोग, व्यावसायिक हॉटेल, प्रदूषण निर्माण करणारे लघु उद्योग, वृक्षतोड यावर निर्बंध असणार आहेत. स्थानिक नागरिकांना घरांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी जमीन खुदाईला परवानगी असणार आहे.
अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्राच्या देखरेखीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी, शासनाद्वारे नियुक्त वन्य जीव संरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ नगर योजनागार, महसूल विभागाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, लोकनिर्माण विभागाचा प्रतिनिधी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक, राज्य सरकारतर्फे नियुक्त पर्यावरण क्षेत्रातील विश्व विद्यालयातील पर्यावरण क्षेत्रातील विशेष तज्ञ, राज्य जैव विविधता बोर्डाचा सदस्य, सावंतवाडी विभागाचे उप वनसंरक्षक हे सदस्य तर कोल्हापूर विभागाचे उप वन संरक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत.