सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी ) आरोग्य विषयाच्या कोणत्याही मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला सहभाग असतो. जिल्ह्यात रविवारी होत असलेल्या पल्स पोलिओच्या मोहिमेला जिल्ह्यातील मातांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. सिंधुनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला.

या पल्स पोलिओ मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील 34901 बालकांना पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. जिल्ह्यातील ९०७ लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबविली रविवारी राबविली जात आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय सिंधू नगरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन एका बाळाला पोलिओ डोस पाजून झाले.

सन 2022 मध्ये पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर आज तीन मार्च रोजी ही मोहीम संपन्न होत आहे. आरोग्य विभागाची 909 पथके काम करत आहेत. जिल्ह्यात 2 लाख 5 हजार 24 एवढ्या घराला भेट देऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते पाच या वेळात हे लसीकरण होत आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्थानके, यात्रा ठिकाणी, विमानतळ, टोलनाके, मजूर वस्त्या इत्यादी ठिकाणी 40 मोबाईल पथके कार्यरत आहेत असे हे डॉ.सई धुरी यांनी सांगितले.