कुडाळ (प्रतिनिधी) : ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२०-२१ चे यशवंत पंचायत राज अभियानातंर्गत पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त कोकण विभागाचे हस्ते कोकण भवन येथे वितरित करण्यात आला. यामध्ये कुडाळच्या पंचायत समितीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक तसेच कोकण विभाग स्तर प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 31 लाख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

पंचायत समिती कुडाळच्या वतीने तत्कालिन सभापती नुतन आईर , उपसभापती जयभारत पालव , तत्कालीन गट विकास अधिकारी श्री विजय चव्हाण, गट विकास अधिकारी धनंजय जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, बाळकृष्ण परब, धनश्री शेडगे,रवि पोवार, महादेव तेली, पूजा डेगवेकर, शेखर माळकर, व सुदेश सुर्वे  यांनी हा सन्मान स्विकारला.

यशवंत पंचायत राज अभियानामध्ये यापूर्वीही सलग 2 वर्ष कोकण विभागात प्रथम आणि राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाआवास अभियानामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरीय प्रथम तर रमाई आवासमध्ये राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे. माझे घर माझा शोषखड्डा अभियानात दहा हजारांपेक्षा जास्त शोषखड्डे पाडून कोरोना कालावधीत बंद चुली पेटवण्यासाठी हातभार लावल्याबाबत महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन पंचायत समिती कुडाळला गौरविले आहे.

तसेच यशवंत पंचायत अभियानात घरकुल योजना, नरेगा योजना, कुपोषण मुक्ती, बंधारे, पशुसवर्धन योजना, जलजीवन अभियान,. मेरी माटी मेरा देश, कुटुंब कल्याण, अशा विविध योजनेत सन 2020/2021 या वर्षात कुडाळ पंचायत समितीने केलेल्या दैदीप्यमान कामगिरीमुळे सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकविले आहे. यांना रोख 31 लाख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुंबई जिल्हाधिकारी संजय जाधव, रायगड जिल्हाधिकारी किसनजी, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी, किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर भानुदास पालवे आदी उपस्थित होते.