नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तेल कंपन्या घरपोच डिलिव्हरीसाठी १ नोव्हेंबरपासून तेल कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) ही यंत्रणा वापरणार आहेत. योग्य ग्राहकालाच सिलिंडर मिळावा आणि सिलिंडरच्या चोरीवर गदा यावी म्हणून ही यंत्रणा लागू केली जात असल्याचं वृत्त आहे.

डीएसी यंत्रणेअंतर्गत, ग्राहकांनी गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. गॅस सिलिंडर घेऊन येणाऱ्या व्यक्तीला ग्राहकाने तो ओटीपी सांगितल्याशिवाय डिलिव्हरीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. जर ग्राहकाचा मोबाइल क्रमांक यंत्रणेत अपडेट केलेला नसेल तर सिलिंडर देणारी व्यक्ती तत्काळ तो अपडेट करेल आणि त्यानंतर लगेच ग्राहकाला ओटीपी पाठवला जाईल. सिलिंडर वितरणाची डीएसी यंत्रणा सध्या जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली असून, सुरुवातीला १०० स्मार्ट शहरांमध्ये ही यंत्रणा सुरू होईल.

एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरळीतपणे व्हावी यासाठी डीएसी यंत्रणा लागू होण्यापूर्वी ग्राहकांनी आपला पत्ता, मोबाइल क्रमांक ही माहिती अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.